काही नाही हो , सगळं नॅचरल असतं



(जे काही आता माझ्याकडून बोललं/लिहिलं जातंय त्याला अपवाद असणाऱ्यांना क्षमस्व !!)

                    नुकतीच 'फकिरा' कादंबरी वाचून झाली त्यात सगळं चित्तथरारक... धगधगता प्रवास...! इथे त्याचा संदर्भ देण्याचा मुद्दा असा की , फकिरा आणि सरुबाईचं एकमेकांवर अफाट प्रेम , एकमेकांना प्रचंड ओढ...!! मात्र कुठेही चुंबन , मिलनाचे वर्णन न करता भाऊंनी कसं मांडलं , हे कसब आश्चर्यात्मकच !!!

                    बाईच्या शरीराचं वर्णन आणि पुरुषाची त्याकडे पाहताना होणारी घालमेल ज्यात लिहिली/दाखवली असेल तेच हल्लीच्या 'माणसांना'(?) रुचतं , पचतं किंबहूना भावतं...!! इंस्टाग्राम , फेसबुक , टिक-टॉक , etc...etc यांवर वाढलेले स्तन दाखवणारे फोटो , त्यांची हालचाल दाखवणारे व्हिडीओ , GIF पोस्ट्स करणारी कैक खाती 'K' आणि 'M' च्या घरात आपले फॉलोअर्स मिरवतात !! त्यांच्या लोकप्रियतेचं गमक हेच असावं बहुतेक..! आणि हो त्यांच्या अशा पोस्ट्स पाहून गालावर मंद हसू आणि अंगात एक तर्र मारणाऱ्यांची काही कमी नाही ! याउलट लिंगाचे व्हिडीओ आणि GIF पोस्ट्सची संख्या 'त्यामानाने' कमीच...! आणि यावर नसेल भागत तर (xxx) ट्रिपल एक्स आहेच की !! असो शेवटी हे सगळं natural आहे हो ! आणि 'असं' सारं कुणी बोललंच/लिहिलंच तर ते 'संकुचित' नाही का... माझ्यासारखे !!! पण वयाच्या अटीनुसार पॉर्न साईट्स पाहता येतात...रोमँटिक व्हिडिओंची काही कमी नाही ! 'फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे' चे काही निवडक सीन पाहिले तरी सुख वगैरे मिळत असेलच ना !! मग प्रश्न हा आहे की , इतकं सगळं उपलब्ध असताना विनोदाच्या नावाखाली बाईचे स्तन (boobs) दाखवून , त्याची होणारी हालचाल प्रदर्शित करून व तिच्या (तुमच्या दृष्टीने लोभस) मांड्या आणि कमरा दाखवून मिळतं तरी काय ? उत्तर 'फॉलोअर्स' असावं कदाचित !! आणि पुन्हा कमेंट्स मधलं मनोरंजन वेगळंच , नाही का !!

ते जाऊदे !

                      आमच्या गॅलरीत माझा रोज संध्याकाळच्या वेळेत व्यायाम चालू असतो...बरीच लोकं मावळतीची किरणं खात असतात...काहीजण पोरांना खेळवत असतात... एक आजोबा आमच्या गॅलरीचा अँगल धरून निरखत असतो... का ते कळत नाही...! आमच्या वरच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या काकू जिन्यातून जाताना क्रॉप टॉप वर उचलला तर माझ्याकडे कित्तीवेळ रोखून पाहतात... बुड टेकायला आले तरी नजरा काही बदलत नाहीत...ना थेरडीच्या ना थेरड्याच्या...!!
               
                      असो तोडकं-मोडकं लिहावं , बोलावं तरी कळीचा मुद्दा काही आवेशाने मांडणं जमत नाहीये... जवळ येऊन ठेपले तरी कळ ज्याने आली ते काही माझ्याने बोलवत नाहीये !!

                      कोरोनाच्या या लॉकडाउनने निरीक्षण करायच्या संधी कैक पटीने उपलब्ध करून दिल्या यात काही शंका नाही... आणि वर निरीक्षणाला पैसे लागत नाहीत , फुकटचं ते... आणखी एक म्हणजे 'जे फुकट असतं ते बघता - बघता खपतं'... कोरोनामुळे पोल्ट्रीतल्या कोंबड्या कशा खपल्या त्यावरून सहज आपलं...!!

                      आताही ग्रॅज्युएशनचं दुसरं वर्ष उजाडायला आलं रे आलं की , पोरगी , 'पोरगी' न दिसता बोहल्यावर चढवायचा फाळकुटाचा तुकडा वाटायला लागतो...! त्यात आणखी एक सांगायचं म्हणजे पोरीचं लग्न ठरायला अवकाश आयांची शिकवणी चालू होते "भाकरीच्या कडा नीट थापायला शिक नाहीतर तुझी सासू म्हणेल आईनं काही शिकवलं की , नाही !" आणि याउलट तिकडे सासवांचं भलतंच... "आता जरा माझं काम हलकं होईल , मदतीला कुणी असलं म्हणजे , आवरता येतं घाईनं सगळं!" यांना तर सरळ सरळ . . . . ! असो वाईट बोलू नये ! पण ; खरंच तुम्ही एक हाडामांसाचा माणूस घरी आणता की , कामाच्या फेऱ्यांना जुंपायला ढोर आणता ?? तुमचं तुम्हाला ठाऊक !!
                       बरं , आपलं घर म्हणून ती तरणीताठी पोर स्वतःचं सगळं बाजूला ठेवून घरातलं सगळं करायला लागते... 'जीव लावून आपलंसं करण्याचा' जणू बाईनं कधी काळी विडा उचललेला असावा...! बाई आपलं करायला जाते आणि तिला आपलं करणारे मात्र आडतात ! कुठल्या उंबरठ्याला आडतात ते त्यांचं त्यांना माहीत !!

                       शेवटी बाईच्या जगात आता मूल , नवरा , सासू - सासरे आणि त्यानंतर येतो तो तिच्या माहेरचा गोतावळा... असं असतं म्हणे सगळं...!!

                        बरं , मी काय म्हणते... पुढ्यात भाताचं भांडं असतं तरी 'वाढ-वाढ'चा सूर ओढणाऱ्यांना काय म्हणावं ?  ती जेवताना मात्र ठसका जरी लागला तरी 'पाणी पी' एवढाच काय तो साद ऐकायला येतो... पाणी देण्याची बुद्धी अजून डेव्हलपमेंटच्या आलेखात आली नसावी...!
                        ते डेव्हलपमेंटचं सांगायचंच राहिलं... आजकाल 'सगळ्याच नाही' पण काही कळ्या आयटी कंपनीत , न्युज चॅनलवर , शाळांमध्ये , संशोधनात , राजकारणात... उमलायला लागल्या आहेत. 'चूल अन् मूल' मधून त्या बाहेर आल्या हे खरंय ; पण 'चूल अन् मूल' थोडंही सुटलं नाहीये हेही तितकंच शंभर वचनी सत्य !!! चूल अन् मूल ही फ्रेज बाकी गुळगुळीत झाली आणि दिवसभर कम्प्युटरकीबोर्डवर त्यानंतर भांड्यांवरून फिरणारे हातही गुळगुळीत झाले म्हणायचे ?!

                        वास्तव रंगवायचं तर उगाच झोंबेल पण ; न रंगवून घुसमट नको व्हायला !! तसंही कुणाला झोंबावं , कुणाला आवडावं म्हणून लिहिणं आजवर झालं नाही , हे कष्ट फक्त 'मोकळं होण्याचे'...!!

                        बरं , ती ग्रॅज्युएशनच्या दुसऱ्या वर्षात असताना बोहल्यावर 'चढवलेली' कळी उमलून कशी कोमेजते सांगायचंच राहून गेलं...! त्या विड्याप्रमाणे ती सारं काही 'आपलंसं' करते... घरातलं मेन कॅरॅक्टर (धनी) बाहेरून आलं की , ऑर्डर सोडतं... ती हातातलं काम सोडून ऑर्डर पुरवते...
                        मेन कॅरॅक्टर (धनी) खूप काम करून आलेत... थकलेत ते ! त्यांना याच सुगरणीनं बनवलेलं जेवण तिनेच वाढायचं... पाणी हाताजवळ ठेवतं करायचं आणि जेवण होईतोवर काय हवंय - नकोय ते पाहायचं... जेवण उरकलं की , खटकटं पाणी भरलेलं ताट उचलायचं आणि पुन्हा ढोर जुंपतं मग... भांडी - कपडे - झाडलोट - साफसफाई... आणि मग स्वतः थोडं वाढून घ्यायचं , ते खायचं आणि उरलेल्या सरी उकरायला ढोर पुन्हा तयार...! ही (ढोर) कुठे थकते ? मेन कॅरॅक्टर थकतं... त्यात आणि प्रेमाविवाहाचा काही विषय असेल तर ते ढोर आणि मेन कॅरॅक्टर वेगळंच !!

                        'आई म्हणून जो मान - सन्मान आज जग आईला अर्थात स्त्रीला देतं त्याच्याच नावाखाली तिला ढोर व्हावं लागतंय...!!' एका बाजूला 8 मार्चला नारी शक्तीचे नारे आणि दुसऱ्या दिवशीपासून पुढच्या वर्षीच्या 7 मार्च पर्यंत स्तन (boobs) , मांड्यांचे नारे !! हा मान - सन्मान इतका आहे की , तोंडातून शिवी हासडली तर ती 'आईघाल्या' अशीच येते 'बापघाल्या' म्हणणारं नसतंच कुणी !!काही नाही हो , सगळं नॅचरल आहे हो !!!

                          सकाळी उठल्यावर झाडू हा या ढोरानेच उचलायचा... मेन कॅरॅक्टर तर थकलंय ना काम करून...!! नंतर जेवण बनवायचं , भांडी घासायची , जेवण वाढायचं ते सगळंही याच ढोराने...(कामवाली असली तरी तिही 'बाई'च शेवटी !!)  कपडे धुवायचे... दुसऱ्या दिवसाची तयारी करायची... सगळं उरकता - उरकता रात्र येते आणि रात्रीची ड्युटी वेगळी सांगायला नकोच !! काही नाही सगळं नॅचरल आहे हो !

                          या ढोराला 'सगळ्यांनी'... आई , ममता , घराचं मांगल्य , मातृत्वाचा झरा अशी कैक सन्मानपदं दिली आहेत...आणि तो सन्मान आता इतका डोईजड झालाय की , तिचं हे असं 'ढोर' झालंय...!! म्हणजे एक्स - वाय (X - Y) एकत्र येतात , एक जीव जन्माला येतो... वाढतो आणि नंतर त्याचं सजीवपण 'माणूस' म्हणून राहात नाहीच ! 'ढोर' होतं ते ढोsssर... आणि ढोर होणं ज्या कळ्या स्वीकारत नाहीत... त्यांना त्या घरातील सकाळच्या डायनींगवरच्या वादापासून ; रात्री बेडवरच्या वादापर्यंतचा प्रवास 'घटस्फोट' नावाच्या स्टेशनला आणून सोडतो... सटवाई लिहिते म्हणे कपाळावर , काय लिहिते तिचं तिला ठाऊक !!!

                         बाई , तू कळी म्हणून उमल नाहीतर ; ढोर म्हणून औताला जुंपली जा... 'पाळीच्या भडभड वाहणाऱ्या रक्तातलं तुझं न दिसणारं दुखणं आणि रात्रंदिवस झटणाऱ्या हातामागच्या वेदना ; इतरांना प्रेम देत राहतील... तुला समाधान देत राहतील... आणि परतीचं म्हणून तुला मिळतील ते फक्त पाणावलेले काठ...!!
बाई , दमलीस तरी थांबू नको ,
        पदर तुझा दडवू नको...
        जीव माणसाचा आहेस विसरू नको ,
        कळी म्हणून उमलताना ढोर म्हणून जुंपू नको....

'काही नाही हो सगळं नॅचरल असतं...!!!'

Popular posts from this blog

Women who shaped my life.

' सहजच स्वतःशी केलेला संवाद '

प्रदीप खेलूरकर (सेक्रेटरी, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान, वर्धा)