' सहजच स्वतःशी केलेला संवाद '


अस्थिरलेलं आभाळ आणि झोंबणारा वारा जेव्हा खुणावत होता की , तुझी वाट थोडीशी चुकतेय तेव्हा खरंच स्वतःला इतकं समजावलं आणि योग्य आहे की नाही हे पाहण्यासाठी खूप उदाहरणेही दिली ....

पायऱ्यांवरून जस जसे उतरत होते तस तसे जमीनही सांगत होती की , " तू जमीनदोस्त होणार नाहीस याची काळजी घे , ज्या ज्या वेळी गोंधळशील त्या त्या वेळी सावध राहा आणि सांग स्वतःला की जोवर पायाखाली जमीन आहे तोवर तू स्वतःला मुक्तपणे वागवशील , स्त्री आहेस म्हणून बंधनात न अडकता मोकळा विहार करशील "....

जेव्हा पाहिलं मी ४ मजली इमारतीकडे तेव्हा तीदेखील खुणावत होती मला , " एकटी नको राहू , मिसळून जा या जगतात , ते वाईट असो किंवा नसो पण विरघळून जा तू तुझ्या आसपास....., समुद्रात 'मोती' ही वास्तव्य करतो आणि खारट असणार 'मीठ' ही पण दोघेही गरजेचे असतात , तसच चांगले आणि वाईट दोन्ही प्रवृत्ती देखील गरजेच्या असतात , समाज वाईट आहे म्हणून स्वतःच स्वतःला दूर लोटून तू यशस्वी नाही होणार "

पुढे पुढे मला आणि माझ्या केसांच्या बटींना छळणारा आणि त्याचा कोमल स्पर्श करून जाणार 'वारा' भेटला तो तर सांगत होता की , " वाहायला शिक गं , साचून नको राहू , माणसाचं जीवन मिळालं आहे तर ते मजेत जग , कारण कधी कधी वहीचं पान फाडून होडी करण्यात मजा आहे , तळलेल्या गोल पापड्या पाचही बोटांत घालून खाण्यात मजा आहे , पायाने घरापर्यंत दगड टोलवत नेण्यात मजा आहे , झोपाळ्यावर बसण्यात मजा आहे , माझ्यासारखं मोकळं हिंडण्यात , झाडांच्या फांद्यांना आपलंसं करण्यात मजा आहे , खरं सांगू का .... लहान होऊन मनमुराद मनाला वाट्टेल ते करण्यात मजा आहे , बघ तुला जमतंय का ...! "

थोडं पुढे गेल्यावर हिरवळीने बहरलेल्या मैदानावरील , आत्ताच्याच रिमझिम पावसाने फुलून आलेल्या गवताच्या पात्यांकडे पाहून छान वाटलं....

..... 'धरणी'....
मला जमीनदोस्त होऊ नको असं म्हणतेस ना तू ....? जेव्हा कोपर्डीतील माझ्या बहिणीवर बलात्कार होतो , म्हैशाळच्या मातीत जेव्हा मला निष्पाप कळ्यांना गाडलेलं ऐकायला मिळतं आणि हुंडा परडवणार नाही म्हणून जेव्हा माझी सखी शीतल वायाळ आत्महत्या करते तेव्हा का होणार नाही मी जमीनदोस्त ..... ? कशी सावरणार मी तेव्हा ? सांगशील का मला ?

....' उंच वास्तू '....
मोती आणि मीठ अशा दोन्ही प्रवृत्ती असतात त्यातही रमायला शिकायचं असं म्हणतेस ना !! ज्यावेळी मोकळेपणाने वावरले जाते तेव्हा मला आणि माझ्या चारित्र्याला 'काहीही' संबोधलं जातं , स्त्री आणि पुरुष या दोघांत फक्त एकच नातं असतं असं म्हणणारा समाज असेल तर कशी मिसळून आणि विरघळून जाऊ मी आजच्या समाजात ? एकटीने राहणार नाही तर मग काय करू ....
उत्तर आहे का ?

....'वारा'....
तू म्हणतोस की मी थोडं स्वतःला वाटतं तसं आणि मनमुराद , मोकळं आणि हवं तसं जगावं !!! अरे मी जर स्वतःच्या मनानुसार वागले तर लोक माझ्याकडे 'आ'वासून पाहत राहतात , खरंच जर मी माझ्या मनासारखं वागले तर वयवर्षे १८ च्या आधीच घरच्यांना माझं लग्न  करता येणार नाही , जर मी मनासारखं वागले तर समाज माझ्या आईवडिलांना वाट्टेल ते बोलेल , जर मी मनासारखं वागले तर कुटुंब सांभाळण्याची आणि स्वतःच्या पायावर उभं राहण्याची ताकद माझ्यात निर्माण होईल जी समाजाला नकोय .... नकोय समाजाला माझं स्वावलंबन , नकोय समाजाला माझं मोकळं जगणं .... जरी केलं मनासारखं तरी चिखल उडवणारा समाज असेल तर त्या चिखलाभोवतीच राहणं मी पसंत करेन ...असं सारं असताना सांग ना रे मी कशी जगू मला वाटतं तसं ...!!

माझी ईच्छा  म्हणजे आजच्या काळातही
पर्यायी समस्या असते रे ,
मला काय वाटतं याचं उत्तर म्हणजे
'सांगूच नको तुझं मत' हे असतं.

२१ वं शतक म्हणजे काय हाच एक सतावणारा , मन आणि भोवतीच्या परिसरातील प्रश्न ! जो मनोवेडा वाटतोय. धरणी , उंच वास्तू , वाऱ्या आत्ता सांगाल का ,
" खरंच माझी वाट चुकतेय का ? "
" खरंच माझी वाट चुकतेय का ? "

Popular posts from this blog

Women who shaped my life.

प्रदीप खेलूरकर (सेक्रेटरी, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान, वर्धा)