संतोषचा सहारा

                       जेव्हा ' बेटा तू मोठा झाल्यावर काय होणार ? ' - मुलाखतकार ' मी लेखक होणार ! ' - असं प्रथम वर्षात शिकणारा दत्ता म्हणतो आणि ' तुला संतोष सर का आवडतात ? ' - मुलाखतकार ' ते माझी पप्पी घेतात म्हणून ! ' - असं अवघ्या चार वर्षाचा किशोर सांगतो... तेव्हा खरंच या तरुणाला सलाम द्यावासा वाटतो !!


                       बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात पाटसरा या छोट्याशा खेडेगावात उसतोड कामगाराच्या पोटी जन्माला आलेलं आगळं पोरगं म्हणजे 'संतोष गर्जे' !! घरात दोन वेळचं खायला मिळायचा प्रश्न असताना... आपल्या बहिणीचं बाळंतपणातील पोर टाकून जीव सोडणं आणि तशा परिस्थितीत भाचीचा सांभाळ करता करता अशा कित्येक मुलांचे कित्तीतरी हाल होत असतील , त्यांचं काय असा विचार करून गेवराई या तालुक्याच्या गावापासून 3 किमी अंतरावर 'सहारा अनाथालय' उभारलेला हा पठ्ठ्या आजच्या तरुणांचा आदर्श ठरतोय...!
              ही गोष्ट आहे एका अनाथांच्या नाथाची , 'संतोष गर्जे' या तरुणाची ! पारधी , वडारी , भिल्ल , बंजारा , उसतोड कामगार , बालविवाह अधिक होणारा भाग आणि जिल्ह्यातील सर्वात मोठी वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांची वस्ती असणारा गेवराई तालुका आणि तिथपासून 3 किमी अंतरावर वसलंय एक वात्सल्याचं , मायेचं , आधाराचं घर 'बालग्राम' ! बहिणीचं बाळंतपणात पोरीला एकटं टाकून निघून जाणं म्हणजे मामा म्हणून संतोषवर त्या काळात एक जबाबदारीच होती... या परिस्थितीला संतोष म्हणतो ' मरण्याचं धाडस नव्हतं आणि जगण्याचा बोजा होता ' ....!!!



                   वयवर्षे 19 असताना ; ज्या वयात आजचे तरुण आपला अधिकाधिक वेळ सिगारेट फुंकण्यात , दारू पिण्यात , पोरींची छेड काढण्यात , कुठल्याकुठल्या विचारांचे झेंडे मिरवण्यात व्यस्त असतात ; अशाच मिसरूड फुटलेलं नसलेल्या वयात अनाथ मुलांचा विचार करून पै - पै मागून आणून 75 उधारीच्या पत्र्यांमध्ये सहारा अनाथालय उभारणार हा तरुण भविष्यातील आदर्श आहे यात कोणतीच शंका नाही. सुरुवातीला माचीस पासून डाळीची वाटी आणि जेवायचा टेबल इथपर्यंत सर्व काही मागून आणावं लागलं... अनेक दानशूर व्यक्तींनी मदत केली... संतोष भावनिक असायचा आणि लोक मात्र व्यावहारिक... तरीही काहींचे आशीर्वाद आणि काहींचे शिव्या - शाप सहन करत करत संतोषने 'सहारा अनाथालय' ते 'बालग्राम' चा प्रवास मोठ्या जिकिरीनं केला... या प्रवासात त्याला साथ मिळाली ती त्याची वकील पत्नी प्रीती हिची... जिने स्वतःच्या विवाहप्रसंगीच 45 अनाथ मुलांची आई होण्याचं स्वीकारलं होतं... आज जवळपास 85 मुलामुलींचा बाप म्हणून संतोष काम करतोय... तो म्हणतो ' वेदनेशी नातं जोडणं छान असतं , आणि ते दुःखच मला जागेवर ठेवतं !! ' नैराश्य आल्यावर गळ्याला दोर लावणाऱ्या लोकांसाठी संतोष एक उत्तम यशस्वी उदाहरण आहे... माती होण्याआधी हे आयुष्य कोणाच्यातरी उपयोगी पडावं म्हणून आजवर चिकाटीने आणि मायेने , प्रेमाने ; आई बाबा नसणाऱ्या , आई बाबा तुरुंगात असणाऱ्या , आई हुंडाबळी गेलेल्या कैक मुलामुलींचा सांभाळ संतोष करतो आहे.


                       हातात दुसऱ्याकडे मागण्याशिवाय काहीच नसताना... स्वतः रोज खायला अन्न मिळेल याची शाश्वती नसतानाही अवघ्या 19 वर्षाच्या वयात हा तरुण आई बाबा नसणाऱ्या , पोरक्या मुलाबाळांना जवळ घेतो , खाऊ पिऊ घालतो , त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतो , त्यांचं आरोग्य सांभाळतो... आणि वयाच्या 30 व्या वर्षी 85 मुलाबाळांच्या पालक बनून आणि नातवांसोबतच्या आयुष्याचा आनंद घेऊन एका वेगळ्या आयुष्याच्या नंदनवनाची कल्पना वास्तवात आणतो तेव्हा खरंच मनापासून वाटते ,  संतोषसारखे आणखी संतोष निर्माण व्हावेत !!
                     संतोष आणि प्रीतीच्या या कामात त्यांच्या साथीला परिवारात परमेश्वर , बाळासाहेब , मंदा मावशी , पूजा मावशी , मोरे मावशी , पुष्पा गोजे मावशी ( ज्या गेली आठ वर्षे 'सहारा'मध्ये स्वयंपाकाचं काम पाहतात ) आहेत तर डॉ.राणी व अभय बंग , डॉ.प्रकाश व विकास आमटे , डॉ.अविनाश सावजी , डॉ.गिरीश कुलकर्णी , 'वेध' परिवार , इ सर्वांची नेहमीच पाठीवर थाप मिळाली.



                    संतोषला आजवर 'गुरुरत्न पुरस्कार'-2013 , 'बाबा आमटे मानवता पुरस्कार' , 'युवा क्रांती पुरस्कार'-2013 , यशवंतराव चव्हाण स्मृती पुरस्कार'-2013 , 'वेध फौंडेशन - जीवनगौरव पुरस्कार'-2014 , 'मराठवाडा भूषण पुरस्कार'-2015 , इ पुरस्कार मिळाले असून असे कर्तृत्व करणाऱ्या संतोषच्या आईला मुलाच्या या कामाबद्दल 'मातृत्व पुरस्कार'ही मिळाला आहे.
                     संतोषची ही धडपड आणि वंचित - पीडित - साहित घटकांचा सहारा बनण्याच्या त्याच्या या स्वप्नात आपण आपल्या परीने हातभार लावूया. संतोष आम्ही तुझ्या सोबत आहोत...

                                            
                                                             

Popular posts from this blog

Women who shaped my life.

' सहजच स्वतःशी केलेला संवाद '

प्रदीप खेलूरकर (सेक्रेटरी, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान, वर्धा)