' राजगड - अविस्मरणीय अनुभव '

                    रात्रीचे १२ वाजून २५ मि. ... किन्न काळोख , कशाच्यातरी आधाराने स्वतःला सांभाळून उभं राहावं लागतंय इतका प्रचंड वारा... धो - धो पाऊस... पायांखालून वेगाने जाणारं पावसाचं पाणी... आणि त्या रात्री आम्ही ३५ लोक १३९४ मी उंचीवर होतो... जे पाहायला मिळेल , जे अनुभवायला मिळेल ते सारं काही नवीन आणि अविस्मरणीय होतं... आम्ही आपल्या लाडक्या राजाच्या स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून आजही डौलाने उभ्या असणाऱ्या राजगडावर होतो...
                    बहामनी राजवटीपासून अस्तित्वात असणारा हा किल्ला सुरुवातीला मुरुम्बदेव किल्ला म्हणून ओळखला जायचा... पुण्याच्या नैऋत्येला ४८ किमी , वेळवंडी आणि गुंजवणी नद्यांच्या खोऱ्यात आणि आजूबाजूच्या डोंगररांगांमध्ये तीनही बाजुंना पसरलेला ; अवाढव्य किल्ला म्हणजे राजगड !! त्याकाळात वेढा घालण्यास अतिशय कठीण... सुवेळा माची , संजीवन माची आणि पद्मावती हि त्याची विस्तारलेली तीन मुखं... किल्ल्याच्या मध्यभागी उंच असा बालेकिल्ला... हे सारं काही मनात साठवत 'जय भवानी जय शिवाजी' च्या नाऱ्यांमध्ये २ दिवस आम्ही तिथे रमून गेलो होतो...



                    पुण्यातील स्वारगेट बस स्टेशन मधून सायंकाळी ०५.१५ च्या सुमारास स्वारगेट गुंजवणे महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसने आम्ही निघालो... साधारण ०८.३० वाजता आम्ही गुंजवणे गावाच्या आणि राजगडाच्या पायथ्याजवळ पोहोचलो... मुसळधार पावसातून चिंब झालेल्या आठवणी घेऊन आता रात्री राजगड चढण्यासाठी सर्वच खूप आतुर झाले होते... रात्री ०९.०० वा. पायथ्याजवळील एका मंदिरात नाष्टा करून आम्ही बरोबर रात्रीचे १०.०० वाजले असता राजगड चढायला सज्ज झालो... अक्षरशः सज्जच झालो होतो ! अंगावर रेनकोट , साहित्याची बॅग आणि टॉर्च हे सगळं सांभाळत आम्ही राजगडावर चढणार होतो... पावसाची न थांबणारी धार , स्मशानकाळोख आणि १३९४ मी उंच चढण... हे सगळं सुरुवातीला स्वप्नवतच वाटत होतं... आम्ही निघालो... राजगडाच्या वाटेने...
                   सुरुवातीलाच चिखल आणि निसरटीने आमचे तीन तेरा वाजवणं चालू केलं होतं... त्यातून मार्ग काढत आम्ही पुढे होत होतो... महेंद्र भाई पुढे होऊन आम्हाला रस्ता दाखवत होते... आम्ही भाईंच्या मागून हळू - हळू पुढे सरकत होतो... आणि आमच्या मागे आमच्या दोन ताई सुचेता ताई आणि मृणाल ताई जे कोणी लंगडतायत , पडतायत , दमतायत त्यांना घेऊन येत होत्या... भाईंनी 3 टप्पे केले होते... पहिला टप्पा आम्ही सगळे चढलो आणि त्यानंतर पथक कामगिरी चालू झाली... एकेका पथकाने आम्ही सर्वाना सांभाळून घेत पुढे जात होतो... चार पथकं होती... कल्पना चावला , मेरी कोमी , निर्मला सीतारामन , अवनी चतुर्वेदी अशी चारही पथकं २ टप्पा पार करून चढली... दरम्यान कधी डाव्या बाजूला खोल दरी तर कधी उजव्या बाजूला खोल दरी... पाय दमाने टाकत आम्ही अंतर कापत होतो... मधे मधेच ऐकू येणारे जंगलातले विविध आवाज... दोन पथकांमधलं अंतर वाढलं तर दोन वाटा आल्यावर योग्य वाट निवडणं इथपासून ते कोणी पडलं तर सावरणं... दरीत टॉर्चचा प्रकाश पाडून तळ दिसतोय का पाहणं हे सगळं कधी गमतीने तर कधी धाडसाने चालूच होतं... ३ रा टप्पा मात्र आव्हानात्मक होता... तत्थपुर्वी थोडा उत्साह यावा यासाठी भाईंनी आमच्यासोबत काही प्रेरणागीतं गायली आणि त्यानंतर आम्ही पुन्हा निघालो... एकेका व्यक्तीलाच जाता येईल इतकी लहान पायवाट जिच्या दोन्ही बाजुंना खोल दरीचा भाग होता... समोर पाहिलं तर नजर सरळ समोर जाणं शक्यच नव्हतं कारण नजर वर वर जात होती ; तसे उंच उंच कडे होते... पावसाचा जोर वाढत होता आणि आम्ही दगडांच्या खाचिंमध्ये हात आणि पाय रोवून चढत होतो... पावसाने चिंब भिजलेलो सर्व रात्री १२.३० च्या सुमारास तीन तासांअखेरीस आम्ही चोरवाटेने गडावर पोहचलो...



                    पद्मावती मंदिरात रात्री विश्रांती करण्याचा आमचा मानस होता... हे मंदिर बरंच जुनं... मंदिराच्या जवळच दोन स्वच्छ पाण्याचे हौद होते जे काठोकाठ भरलेले होते... रात्री १.३० वा आम्ही चपाती बटाट्याची भाजी खाल्ली आणि सकाळी ०६.०० वा उठायची मानसिकता तयार करत आम्ही रात्री ०२.०० वा झोपायची तयारी चालू केली... मंदिरात आतमध्ये पावसाचं पाणी आलंच होतं... आणि मंदिराच्या छपरातूनही पाणी गळत होतं... रात्रीचा अतिशय सुरेख अनुभव घेऊन आम्ही पुन्हा सकाळी पथककार्यातून नाष्टा करून बालेकिल्ला चढायला निघालो...
                    बालेकिल्ला चढताना राजगडावरची नयनरम्य दृश्य पाहून डोळ्यांचं पारणं फिटत होतं... बालेकिल्ला चढताना येणारे कडे कधी ५० अंशाच्या कोणातले तर बहुतेकवेळेस ९० अंशाच्या कोणातले होते... थोडी भीती आणि वरवरचं साहस दाखवत भाईंच्या मागोमाग आम्ही बालेकिल्ला चढून पद्मावती माचीचं वरून दिसणारं दृश्य पाहत होतो मात्र धुकं इतकं प्रचंड प्रमाणात होतं की , समोर अथांग समुद्र आहे असा वेळोवेळी भास होत होता... बालेकिल्ला महादरवाजा , चंद्रकोर तळं , टेहळणी बुरुज आणि शेवटी बालेकिल्ल्याचा सर्वाधिक उंच भाग जिथे भगवा झेंडा अभिमानाने फडकत होता तिथे आम्ही पोहोचलो... काही स्फुरणगीते म्हटली... महाराजांच्या आठवणी मनात तेवत राहिल्या आणि पुन्हा बालेकिल्ल्याला वेढा घालून आम्ही परतीच्या प्रवासाला लागलो... पावसाची धार अजूनही त्याच आवेशाने बरसत होती... पुन्हा पद्मावती मंदिरात येऊन सामान घेऊन आम्ही पालीच्या वाटेने म्हणजेच मुख्य दरवाजाने उरतीचा प्रवास करू लागलो... आजपर्यंत इतका वेळ पावसात भिजण्याचा , इतक्या रात्री गड तोही राजगड चढण्याचा अनुभव घेतला नव्हता... आपल्याला 'हे' कधी शक्यच नाही असं जे काही वाटत होतं ते सगळं काही दूर झालं होतं...!! मुख्य दरवाजाचा भाग सोडून आम्ही दुपारी ०२.०० वा. खाली उतरायला लागलो तसे सह्याद्रीच्या कड्या कपारींमधून फेसाळलेले धबधबे डोळे दिपवत होते... हि उतरणीची वाट मात्र भयंकर निसरटीची होती... समोर पाहिल्यावर हिरवंगार दृश्य आणि हळूहळू मिटत जाणारं धुकं आणि त्यानंतर दिसणाऱ्या पायथ्याशेजारच्या लहान - लहान देखण्या वाड्या... आहा !!!



                खाली उतरल्यावर सर्वांनी कडक चहा घेतला आणि पायथ्याला लागून असणारं पाली गाव सोडून वाजेघर गावात आम्ही चुलीवरची भाकरी - पिठलं , खिचडी असं पोटभर जेवण केलं... आणि आयुष्यभरासाठी पुरतील एवढ्या राजगडाच्या आठवणी प्रत्येकीच्या मनातल्या आठवणींच्या डब्ब्यात कैद करून पुण्यासाठीच्या परतीच्या प्रवासाला लागलो...

                                                

Popular posts from this blog

Women who shaped my life.

' सहजच स्वतःशी केलेला संवाद '

प्रदीप खेलूरकर (सेक्रेटरी, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान, वर्धा)