सैराटीयन

                         सात वर्षांपूर्वीची एक घटना आठवते , मी हायस्कूलमध्ये शिकत होते तेव्हाची !! आमच्या भागात एक प्रसिद्ध मंदिर आहे.  तिथे दरवर्षी मोठी यात्रा असते. या यात्रेत एक मोठे महंत -  महाराज येतात आणि वर्षभराचे भाकीत करतात. भाकीत म्हणजे भविष्य ( Prediction - प्रेडिक्शन ) . त्या मंदिराच्या भागातील , परीसरातील काही गावांकरिता ते लागू पडतं... तर सात वर्षांपूर्वी ; यात्रेनंतर शाळेत आम्हा मुलींमध्ये चर्चा सुरू झाली... गप्पांचा विषय साधारण आठवडाभर तरी ते 'भाकीत'चं होता. त्यावेळी बऱ्याच गोष्टी त्या महंत - महाराजांनी भाकितात सांगितल्या होत्या , त्यात एक भाकीत असं होतं की , "भागातील बारा वर्षांच्या मुलीला बाळ होईल" . 


                      त्या काळात हे ऐकल्यावर तेव्हाच्या शाळकरी मनाला प्रश्न पडणं काही गैर नव्हतं. मी तेव्हा खूप घाबरले होते.  माझ्या शाळेतील कुणी ती मुलगी नसावी ; म्हणून मी बराच वेळ बोटात बोट अडकून ( फिंगर क्रॉस = मनात ईच्छा धरण्याची अल्लड सवय ) इच्छा मनात धरलेलं अजूनही आठवतं मला... पण ; जर तिला बाळ झालं तर ती काय करेल ? इतक्या छोट्या मुलीला बाळ कसं काय होईल ? असे खुप प्रश्न माझ्या अंतर्मुख मनाला पडतच राहिले... तेव्हा ते कळतच नव्हतं कि , एक वेळ अशी येते की , माणूस 'सैराट' होतो...

                    मुलं आईच्या गर्भातून बाहेरच्या जगात प्रवेश करतात . ती शाळेला जायच्या वयाची होत नाहीत तोवर त्यांच्या मनात मुलगा - मुलगी असा भेद नसतोच मुळी ! गावाकडच्या भागात लंगडीचा डाव -  जिबलीचे रकाणे - सुरपारंब्या - रिंगणातला भोवरा - बल्ल्यांचा डाव ; तर शहरी भागात पकडापकडी , रिचिरीच , सिसॉ , हाइड अँड सिक असे ना - ना तऱ्हेचे खेळ मुलं - मुली लहानपणी एकत्र खेळत असतात... कालांतराने शाळा नावाच्या जगात ते प्रवेश करतात... हळू हळू त्यांची शारीरिक वाढ होत असते... लहान असताना त्यांना आपल्या आजूबाजूला मोठे दादा - दीदी पाहायला मिळत असतात... प्रश्न तर सर्वांनाच पडतात... हे दादा - दीदी हळू आवाजात का बोलतात किंवा लपून छपून का भेटतात... त्यानंतरची बाजू म्हणजे टीव्हीवर बऱ्याच चित्रपटांतून , मालिकांमधून , जाहिरातींमधून त्यांना हे प्रश्न पडण्याची कारणे सापडत जातात... प्राथमिक शिक्षण घेत असताना त्याची ही परिस्थिती असते.


                             मात्र हायस्कुल मध्ये गेल्यानंतर वयही वाढतं , शारीरिक वाढही होते आणि जनुकीय बदलांना ( harmonic changes ) सुरुवात होते. मग तर प्रश्न वाढत जातात... एखादा मुलगा किंवा एखादी मुलगी पाहील्यावर छान वाटतं... बोलू वाटतं , मैत्री करावीशी वाटते... हे नैसर्गिक आहे पण जेव्हा इतर मित्रांची मैत्रीण किंवा मैत्रिणीचे मित्र अशी मैत्री हायस्कुल वयात पहिली कि , अनुकरणप्रिय माणूस अनुकरण करायला जातो... हि अशी मैत्री काही काळ राहते... मात्र हायस्कुलचं जग सोडून कॉलेजच्या सगळ्याच अंगाने मोकळ्या असणाऱ्या वातावरणात जेव्हा हीच मुलं - मुली प्रवेश करतात तेव्हा मात्र त्यांना वेसन घालणं पालकांना सहज श्यक्य नसतं... हातात स्मार्टफोन येतो... नेट कॅफेज् जागोजागी असतातच... मित्रमैत्रिणींमध्ये असणारे गप्पांचे विषय... संगत कशी आहे... सिनियर्स काय करतात...या सगळ्या गोष्टी आणि सोबतच भावनिक आंदोलनांचा काळ... अशात बरेच विद्यार्थी - विद्यार्थिनी कॉलेजियन्स न राहता सैराटीयन्स होतात... आणि या सैराटीयन धावत्या आणि अतिआत्मविश्वासू पिढीला थांबवणं... चांगलं - वाईट सांगणं... तेही त्यांनी सैराटीयन व्हायचं ठरवल्यावर... कठीण होतंय... खरंच कठीण होतंय... खरं सांगायचं तर आजूबाजूची परिस्थिती या सगळ्याला खूप कारणीभूत ठरते... जर वातावरण मोकळं आणि निखळ असेल तर तरुण सैराट होणं क्वचितच ! पण जर वातावरण दबावाचं... दडपणाचं... आणि संकुचित असेल तर तिथे मात्र मोकळेपणा शोधण्यासाठी म्हणा किंवा गूढ निर्माण झालेल्या गोष्टींचा शोध घेण्यासाठी... तरुण सैराट होण्याचा धोका अशा वातावरणात अधिक असतो...



                        माझ्या एका मॅडमांच्या घरी कामाला येणारी अठरा - एकोणीस वर्षांची तरुण मुलगी दर दोन महिन्यांनी आठवडाभर दांडी मारायची. नंतर कळलं की तिचे बाबा ज्या हॉटेलमध्ये कपबशा विसळण्याचं काम करतात ; तिथला एक गरिब मुलगा परिस्थितीमुळे तिच्या बाबांच्या सांगण्यावरूनच ; त्यांच्या घरी राहायचा. वडिलांना दारुचं प्रचंड व्यसन ! दरम्यानच्या काळात समवयस्क असल्याने या दोघांमध्ये लैंगिक संबंध येत राहिले आणि ती मुलगी दर दोन महिन्यांनी आवश्यक असणाऱ्या गर्भपातास बळी पडत राहिली... आमच्या शेजारी अकरावी झालेली मुलगी सहा महिन्यांची गरोदर कालांतराने कळलं की कॉलेजला जाण्याऐवजी ती तिच्या एका मित्राला वस्तीच्या बाहेर शेतात भेटायची... आई-वडिलांना मोठा प्रश्न पडलाय 'आता पुढे काय ?' माझ्या मित्र परिवारातील एक नववीची मुलगी एक महिना शाळेला आली नाही , महिन्यानंतर तिचं लग्न झाल्याचं कळलं...



                      माझ्या ओळखीतील एक नव्हे तर बरेच सीनियर दादा लोक बऱ्याचदा वेश्यावस्तीत गिर्‍हाईक म्हणून जाऊन आलेत !! आमच्या गावाकडचा एक मुलगा रात्री दहा वाजता एका मुलीला घरी घेऊन आला , ती तीन महिन्यांची गरोदर होती...!! रात्री चादरीखाली स्मार्टफोनमधून मुलांना बरंच काही कळून जातं ' ब्ल्यू फिल्म , पोर्न साईट्स' आणि याविरुद्ध ' घरातील अवघडलेले वातावरण ' त्याचे हे परिणाम आहेत...



                     ते दोघे कॉलेजमध्ये भेटले. मैत्री झाली. ( इथे प्रेमापेक्षा आकर्षण म्हटलं तर ते अधिक योग्य होईल ) त्यांच्यात आकर्षण निर्माण झालं. आकर्षणाची पुढची पायरी म्हणजे शारीरिक संबंध आणि त्यानंतर लैंगिक संबंध ! शिक्षण घ्यायला गाव - पाड्यांमधून आलेली काही मुलं - मुली या भावनिक आंदोलनाचा काळ असणाऱ्या वयात केवळ शारीरिक भूक भागवताना बळी पडतात... यात शहरी मुलामुलींचाही समावेश आहेच पण ती बाब वेगळी ! कारण शहरातील मुलं आधुनिक बाबींच्या जवळ असतात... त्यांना यातून निर्माण होणारे धोके आणि घ्यायची काळजी यांची कल्पना असते... मात्र नैतिकता दोन्ही स्तरांवर कुठेतरी डळमळलेली पाहायला मिळते...



                       एक बाजू पाहायची झाल्यास या वयात मनात येणाऱ्या भावना शरीराच्या इच्छा , गरजा या का निर्माण होतात ? यावर उपाय काय ? अशा प्रकारची माहीतीपूर्ण चर्चा झाली तर तो मुलगा किंवा मुलगी आकर्षणाच्या पुढच्या पायरीचा स्वीकार करणार नाहीत अर्थात सैराट होणार नाहीत...आपल्या समाजात या गोष्टीबद्दल मोकळेपणाने बोलणं म्हणजे ' तोंड घाण करणं ' असं समजलं जातं. आजवर मोकळेपणाने बोलणं राहून गेलंय म्हणून गूढ निर्माण झालेल्या 'या' गोष्टीचा तरुण मुलंमुली वाईट किंवा चुकीच्या मार्गाने शोध घ्यायला जातात आणि कालांतराने पश्चाताप भोगतात... ओशोंच्या मतानुसार स्त्री आणि पुरुष यांनी जर एकमेकांचे वेगळे असणारे अवयव उघडपणे पाहिले असतील किंवा त्या अवयवांबद्दल त्यांना माहिती असेल तर जनुकीय बदलांना सामोरं जाताना त्यांना सैराट व्हावंसं वाटणार नाही...


                       दुसरी बाजू अशी की , वयात आलेल्या मुला-मुलींना जर मनातलं बोलता येत नसेल तर किमान स्वतःलाच प्रश्न विचारून , स्वतः वाचन करून उत्तरे शोधली पाहिजेत ; मात्र हा आकर्षणाचा , शरीरसंबंधाचा , सैराटीयन होण्याचा आतेताईपणा होऊ देऊ नका...कुणीतरी आवडणं , आकर्षण वाटणं , बोलावसं वाटणं हे नैसर्गिक आहे... त्या सगळ्याला प्रेम मुळीच म्हणता येणार नाही... मित्र-मैत्रिणींनो आपण एक शिकलोय की , या सृष्टीतील विरुद्ध गोष्टी एकमेकांकडे आकर्षिल्या जातातच ! आणि हा 'नैसर्गिक नियम आहे' ... निसर्गाला हे विश्व पुढे चालवायचं आहे... म्हणूनच तर त्याने प्रजनन घटक निर्माण केलाय... त्याला तुच्छ लेखून किंवा त्याला डावलून काहीच साध्य होऊ शकत नाही... म्हणजेच शरीरसंबंध हे मानवी वारसा किंवा वंश टिकवण्याचे सत्य आहे ! मात्र ज्या - त्या क्रियेला किंवा ज्या - त्या गोष्टीला एक वेळ असते. आपल्याला कोणती गोष्ट कधी करायची ? आणि आत्ता सर्वाधिक महत्त्वाचं काय आहे ? हे जर कळलं तर कदाचित तरुण सैराट होण्याची शक्यता कमी होईल...

                        आपल्या समाजाने 'कुटुंबसंस्था' , 'ग्रामसंस्था'  तसेच 'विवाहसंस्था' आणि त्याचे काही नियम बनवले ते याचसाठी की , कोणी भरकटत वा वाहवत जाऊ नये ! योग्य वेळी योग्य ते व्हावं म्हणून पूर्वी गुरुकुल शिक्षण पद्धतीत विद्यार्थ्यांना मुंज बांधून वचन घेतलं जायचं कारण ; त्या वयात जे महत्त्वाचं तेच केलं पाहिजे... तशाच पद्धतीची आधुनिक संकल्पना म्हणजे लैंगिक शिक्षण , मूल्यशिक्षण... या गोष्टी ग्रामीण भागापासून शहरी भागापर्यंत कितपत अंमलात आणल्या जातात याचा विचार करणं आजची गरज आहे... सध्या समलैंगिक विषयही तितकाच गंभीर आहे ! त्याबद्दलही मोकळा संवाद झाला पाहिजे... मध्यंतरी एलजिबीटीक्यू ( LGBTQ = Lesbian , Gay , bisexual , Trans gender , Questioning ) असा मुद्दा प्रचंड गाजत होता अर्थात आजही तीच परिस्थिती आहे... मुलगीला मुलगी आवडणं , मुलग्याला मुलगा आवडणं , मुलग्याला मुलींसारखं राहणं आवडणं , मुलगीला मुलांसारखं राहणं आवडणं किंवा दोनही लिंगांबद्दल आकर्षण वाटणं... या सगळ्या नैसर्गिक गोष्टी भारतीय समाज तितक्याशा मोकळीकतेने स्वीकारणं अजूनही सोपी गोष्ट नाही किंबहुना ते श्यक्यही नाही... पण पालकांनीही हे सर्व लक्षात घेतलं पाहिजे... हळूहळू बदल होतीलच ,  मुक्त वातावरण निर्माण होईलच. आपण तरुण मुला-मुलींनी मात्र योग्य गोष्टीला योग्य प्राधान्य देऊन वर्तन केलं पाहिजे...



                        प्रेमाची व्याख्या इतकी सहज - सोपी अजिबातच नाही की , आपण एका महिन्यात प्रेमात पडून , शारीरिक संबंध निर्माण होऊन प्रेम साध्य होईल ! त्याने किंवा तिने 'हो' किंवा 'नाही' म्हणणं यावरही ते अवलंबलेलं नाही !! 'प्रेम ही तपश्चर्या आहे कोणतीही गरज नाही !' मग सैराट होऊन प्रेम साध्य कसं होऊ शकेल याचाही विचार तरुणांनी करायला हवा...

                        पालकांनी त्या - त्या वयात आपल्या पाल्यांशी याबाबत खुली चर्चा किंवा मैत्रीपूर्ण संवाद केला पाहिजे ; अन्यथा 'माझी मुलगी/मुलगा त्यातला नाही' हे वाक्य देखील खोटं ठरेल... आणि कुठला तरुण / तरुणी कधी सैराटियन वर्गात प्रवेश करतील सांगता येणार नाही... आत्ता या घडीला मला माझ्या गुरुवर्यांची शिकवणी आठवते ; ते सांगायचे कि , 'आयुष्यात स्वतःला तत्त्वांमध्ये बांधलं तर सैराटीयन व्हायची कधीच गरज भासणार नाही...!!'

                                           
 

Popular posts from this blog

Women who shaped my life.

' सहजच स्वतःशी केलेला संवाद '

प्रदीप खेलूरकर (सेक्रेटरी, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान, वर्धा)