' चल तरुणाई... '
तरुणाई , शूsss... आवाज नको करू... चल... चोरी करायला चल... 'चोरी'च करायला चल... हो , हो चोरी 'करायलाच'... लाठी-मार , दगड-गोटे आणि झेंड्यांचीही... चोरी करायला चल... मंदिरातील गाभाऱ्याचीही...! चोरी करायला चल मशिदीची , गुरुद्वाराची , चर्चची... 'सगळ्याच देव्हाऱ्यां'ची... चल तरुणाई , चोरून नेवूया आपण वासनेची भावना...आवाज नको करू...इथे ऐकायला 'लाख्खो' बसलेत 'आपापला बस्ता' घेऊन... 'कुऱ्हाडीनं' वार करतील... नाहीतर , नाहीतर तुझ्या नकळत ; तुझ्याच डोक्यातून बंदुकीची गोळी आरपार होईल... जी हल्ली अनेकांना चिकटतेय आणि चिकटवणारे मात्र चिकटवण्यासाठी वापरलेल्या डिंकामुळे डोळ्यांसमोरून गायब होतायंत... चल तरुणाई 'तो डिंक' आणि 'ते चिकटवणारेच' चोरून आणू... जिथे आहेत ; तिथून चोरून आणू...
'तरुणाई' चल उशीर होतोय... विश्रांतीची वेळ आता निघून गेलीय... 'विचारांची तार' तुटून निघेपर्यंत आणि वणवण करून 'पायाच्या तळव्यांना फोड येईतोवर' फिरायचंय... भटकायचंय आपल्याला... जोवर आपण लाठी-मार , झेंडे , गाभारा , वासनेची भावना चोरत नाही ; तोवर भटकायचंय...चल सगळे रंग पुसून टाकू... 'नाही' , 'नको' पुसले तर पुन्हा उमटतील... म्हणून चोरुनच आणू... चल तरुणाई... शिक्षण घेताना केलेल्या विभागणीच्या 'रकान्यां'चीच चोरी करू... 'इथून इकडे माझा इलाखा आणि तिथून तिकडे तुझा इलाखा' असं म्हणण्यास भाग पाडणाऱ्या त्या 'सीमारेषेची' चोरी करू... चल तरुणाई...कित्येक ; 'कोरड्या जमिनीवरील झाडांना लटकवलेले' फासच चोरून आणू... 'भुकेने मरणाऱ्यांची भूक' चोरून आणू... 'शिकूनही रोजगार न मिळणाऱ्यांचं शिक्षण'च चोरून आणू... 'अज्ञानी' म्हणून तरी जगेल...!
चल तरुणाई... 'तो' आणि 'ती' ठरवून 'भेद माजवणाऱ्या लिंगाची'च चोरी करू...चोरी करू आपण जातीची... चोरी करू आपण धर्म , वर्ण , लिंग , अविचार , वासना , बेरंगी रंग , ना-ना तऱ्हेचे झेंडे... आणि प्रत्येक स्तरावर 'माणसाला विभागणाऱ्या रकान्यां'ची... आणि तरुणाई , ऐक ना... शेवटी ना आपण एक काम करू... 'आभाळाच्या श्वेत रंगात संपूर्ण पृथ्वीला न्हाऊन टाकू'... चल तरुणाई... येशील ना माझ्यासोबत ??? कळव मला तुझ्या 'येण्या' - 'न येण्याचा' निरोप... प्रतीक्षेत आहे....


