' प्रिय शहरातल्या दादा....! '
दादा , काय म्हणतोयस ? शहर काय म्हणतंय तुझं ? ठीकच असणार , माहितीय मला....आणि हो हेही माहितीय की , हे पत्र वाचायला सुद्धा तुला वेळ नसणार ; इतका तू व्यस्त असतोस तुझ्या कामात ...! अरे परवाच गावी जाऊन आलो ; आठवड्याला जातोच मी , म्हटलं रव्या दादाच्या घरी जाऊन येऊ ... स्टडी सर्कल बंद झालं त्यानंतर काही भेटलोच नाही आपण... घरी गेलो होतो तुझ्या , तुझी माई भेटली म्हणजे ; माझी सुद्धा आहेच हं... म्हटलं माईच्या हातचा चहा पिऊया ! खूप दिवस चव घेतली नाही पण ; चव बदलली नाही हो अजूनही !! आणि हो तुला 'आलं' लागतं ना , तर माईने आठवण काढली होती , म्हणत होती ''रव्याला 'आलं' लागतं अरे चहामध्ये तुलाही आवडतं ना ?" रव्या दादा माईची तब्बेत खूप खराब झालीये रे . डोळे आत गेलेत आणि कपाळावरच्या आठ्या वाढलेत रे खूपच...!
माईला पाहिलं की मला माझ्या आईची आठवण येते पण ; रागही येतो आईचा , बघ ना मी पाचवीत असतानाच गेली देवाला भेटायला... असो ! देवावरची माईचीही श्रद्धा पाहिली की , अचाट व्हायला होतं...! मी गेलो तेव्हा पूजेच्या ताटात देवाला अंघोळ घालत होती तुळशीच्या पानांनी आणि काहीतरी प्रार्थना चालू होती...म्हणून मीही डिस्टर्ब केलं नाही तिला...मी घराचा बदललेला अवतार पाहत होतो... रव्या दादा अरे तुझा आणि वाहिनीचा लग्नातला फोटो अजूनही आहे तिथेच आहे रे !! मला आठवतंय ती फोटोफ्रेम बनवायला मी आणि तुझे आबा म्हणजे माझेही आबा गेलो होतो... आबा इतक्या लवकर जातील असं वाटलं नव्हतं...आजही घरी गेल्यावर त्यांची ती समोरची खुर्ची रिकामी-रिकामी भासते...! ते न्याहाळतंच मी हॉल मध्ये बसलो , तोवर माईने हाक मारली मला ...( त्याच पूर्वीच्या मोठ्या आवाजात ) म्हटली ''दिनू बाळ आतमध्ये ये , सकाळीच मिसळ केली होती आज , रव्याला आवडते तशीच केलीय कडधान्याचे सगळे मोड घालून ..." लादी ब्रेडच दिला रे त्यांनी , तुला आवडतो तोच ... 'हिंदुस्थान बेकरी'तला ....
मी मिसळ खात असतानाच माईने तांदूळ निवडायला घेतले... म्हणत होती "रव्याला द्यायचे आहेत , बघू येतो काय या सुट्टीत तरी...!! रव्या दादा तुझे जुने शर्टसुद्धा माईने ट्रंकमध्ये जपून ठेवलेत... तुझ्या ट्रॉफीसुद्धा...... आणि माई बोलताना सारखं रव्या - रव्या करत होती... माईचे पाणावलेले डोळे पाहिले ना तुझं नाव घेतल्यावर ते , पाहून वाटलं तुला जाब विचारावा... ; म्हणून तुला हे पत्र लिहितोय...
रव्या दादा कधी आला होतास गावी शेवटचं ? माई ना आजही तुला आवडते तशीच मिसळ बनवते आणि साधा चहा करताना सुद्धा तुझी आठवण काढते... तुला येते का आठवण हॉटेलमध्ये जेवताना ? पार्सल मागवलेलं खाताना...माई आठवते का तुला ?? दादा शेवटचं खूप दिवस असं माईसोबत केव्हा राहिलास ? काही आठवतंय का रे ?? रव्या दादा तुझा फोटो आजही आहे तिथेच आहे पण ; तुझ्या प्रायोरिटीज मध्ये मात्र माईची जागा आहे तिथेच आहे का ? प्रायोरिटीज मध्ये राहुदेत ; तुझ्या फॅमिली फोटो मध्ये किंवा फॅमिली फोटो च्या बाजूला माई-आबांचा साधा फोटो तरी आहे का रे ??
दादा , मला आठवतंय की , स्टडी सर्कल ला येताना तू जेवणाचा डबा घेऊन यायचास , खूप भारी जेवण करते माई ! माझी आई करायची ना अगदी तसंच... मी आईच्या हातचं पाचवीत असताना शेवटचं खाल्लं... तुझी माई आजही आहे पण ; तुला आठवतंय का रे तिच्या हातचं शेवटचं खाल्लेलं ? माईने एकदा मी घरी आल्यावर तुला लगेच आवरायला सांगितलं होतं आणि आपल्याला घेऊन ती बागेत गेली होती , फिरायला...आठवतंय का ?? पण ; आज बायको , मुलांसोबत पिकनिकला जाताना तुला माई आठवते तरी का ? दादा अरे तिने देवाच्या दर्शनाला गेल्यावर आणलेला प्रसाद अजूनही कपाटातल्या वरच्या डब्यात ठेवलाय तुला द्यायला...! तू भले जात नसशील देवदर्शनाला पण ; खायला आणलेलं खाताना बाजूला काढून ठेवायचं किंवा पाठवून द्यायचं राहूदेच पण ; त्यावेळी तुला माई आठवते तरी का ? लहान असताना माईने सारं काही तुला दिलं पण ; आता दादा तू मोठा झालास , मोठा झाल्यावर तुला असं वाटत सुद्धा नाही का की , माईला काहीतरी द्यावं ?? रव्या दादा तिने खूप काही साठवून ठेवलंय तुला द्यायला...तू येत नसतानाही...!! तू मात्र माई आहे अजून तरीही तिची आठवणसुद्धा काढत नाहीस....पाणावतात रे तिचे डोळे......
आबा गेल्यानंतर एकटीच आहे ती इतकी वर्षं... तुझ्या आशेवर जगते.... म्हणून ; प्लिज माईसाठी वेळ काढ थोडा...थोडा का असेना पण ; वेळ काढ... तिला आठवायला तरी वेळ काढ... भेटणं तुझ्याकडून होणार नाहीच कदाचित....!!!
तुझा ज्युनियर ,
'दिन्या'


