बांगड्या

                         

                   
                     माझ्यासारखीच दिसायला आणि बोलतेही चुणचुणीत अजुनही चेहऱ्यावर निरागसपण आणि गोंडसपण दिसते , देखणेपण तरी इतके की सुरेख वाटतो अगदी चेहरा ... त्यावर मग हळूच टिकली येते गोल थोडीशी मोठी , लाल रंगाची आणि जबरदस्तीने लावली आहे अशी दाबून रुतवलेली ...! तीही पेपर लिहितेय आणि मीही ... माझ्या हातात फक्त घड्याळ आणि त्यावर माझे लक्ष्य .... तिच्या हातात हिरव्या बांगड्या ... आणि ती घड्याळ बघत नाही तर कोवळ्या मनाने लिहिताना सारख्या मधे - मधे येणाऱ्या त्या बांगड्या मागे करते... मी खूप हसत - रमत लिहिते पेपर ती मात्र गांगरून जातेय ... समाजाच्या नजरांना की , तिच्याच वयाच्या आजही बालपण आणि तरुणपणाचा आस्वाद घेणाऱ्या तिच्या मैत्रिणींच्या...??? प्रश्नच ....! खूप मग्न होऊन लिहीत होती पेपर पण सर्वांचे लक्ष्य त्या बांगड्यांच्या आवाजाकडे सारखे सारखे जात होते ... माझेही ...!
                     मनात साचलेले लिहीत होती की पुस्तकात वाचलेले नाही माहीत ; पण मनात खूप काही साठवून लिहीत होती ... तिच्या बांगड्यांचा आवाज प्रश्न निर्माण करत होता ... तिने घातलेल्या त्या गर्द हिरव्या बांगड्या तिने स्वतःच्या इच्छेसाठी घातलेत की दुसऱ्या कोणाची इच्छा पूर्ण करण्यासाठी ....! तेच कळत नव्हते ... अक्षर फार सुंदर होते... माझ्या बाजूच्याच बेंच वर होती ती ... रोज थोडी लेट यायची आणि मला खूप प्रश्न विचारायची मनातच... ( तशी लेट येण्याची परवानगी कॉलेज मधून मिळाली असावी तिला ) मी पेपर झाल्यावर फ्रेंड्स सोबत मजा मस्ती करणार होते आणि ती घरी जाऊन संसार आवरणार होती ... मी पेपर देऊन कुठेतरी छान ठिकाणी फिरायला जाऊन सेल्फी आणि मस्त फोटो काढणार होते आणि ती मात्र कपाळाची टिकली , हिरव्या गर्द बांगड्या आणि त्यांचा आवाज सांभाळत सुंदर घर मनात जपणार होती .... मी कुठेतरी हसत गप्पा मारणार होते आणि ती मात्र मनातली घुसमट भांडी घासता - घासताच गाळणार होती ...! 
                      कसे हे सगळे ??? माझे आणि तिचे 'असणे' होते...??? प्रश्नचिन्हांनी भरलेले...! मला दाटलेल्या आभाळातील पाणी पुन्हा मस्त मजेत चिंब भिजण्याची आठवण करून द्यायचे तिला मात्र ते बरसणारे पाणी सुकत टाकलेली कपडे घरात आतमध्ये आणण्याची आठवण करून द्यायचे.... मी लाईट गेली तर खूप ओरडायचे , चित्रविचित्र आवाज काढायचे आणि हसत बसायचे ती मात्र दिवा शोधायची ...! 
तिला स्वतःला स्वतःचा प्रकाश दाखवणारा दिवा ना तिने कधी शोधला ना तिला सापडल्यावर कधी लावला... स्वतःला शोधण्यासाठी वेळ तर नाहीच पण मनातली घुसमट सांगण्यासाठीही वेळ ठेवला नाही तिने...! तरीही ती पेपर लिहायला आली होती हेच खूप आहे...!
                   तिचे माझे वय सारखे , तिचे माझे अस्तित्वही सारखेच ... तिचे माझे असणे आणि दिसणेही सारखेच मात्र ... तिचे माझे जगणे वेगळे...! तिचे आयुष्य बांगड्यांच्या आवाजांनी वेढेलेले आणि तिनेही त्या आवाजाला आपले केलेले...! आणि माझे आयुष्य म्हणजे मोकळेपणा मनाचा , विचारांचा...!
                   मी छान हिंदी गाणी ऐकते तेव्हा तिला मात्र तो बांगड्यांच्या आवाज मर्यादा घालून देतो...! तिचा बांगड्यांच्या आवाजाचा नाद खूप छान आहे पण तो तिला , तिला हवा तेव्हा ऐकायला दिला तर ... तिला ती लाल गोल मोठी टिकली खूप छान दिसते पण तिला वाटेल ना की आपण ती टिकली आता लावूया तेव्हाच तिला ती लावली तर..., तर ... किती छान होईल... ती माझ्याशी आणि मी तिच्याशी मस्त गप्पा मारू त्याही न संकोचता ...! मग तीही म्हणेल किती सुंदर आहे माझे ' आयुष्य अन् मी ' ...!  ( भाग २ )


Popular posts from this blog

Women who shaped my life.

' सहजच स्वतःशी केलेला संवाद '

प्रदीप खेलूरकर (सेक्रेटरी, सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठान, वर्धा)